गणेशोत्सवात प्रसाद वाटपावर ’एफडीए’ची करडी नजर   

सार्वजनिक मंडळांना नोंदणीच्या सूचना 

पुणे : गणेशोत्सवाच्या कालावधीत सार्वजनिक गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना आणि गणेश भक्तांना प्रसाद वाटपादरम्यान स्वच्छतेच्या नियमाचे काटेकोरपणे पालन करावे, असे आदेश अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) नुकतेच काढले आहे. तसेच, प्रसाद स्वत: तयार करुन भाविकांना वितरीत करणार्‍या गणेश मंडळांनी एफडीएकडे नोंदणी करावी, अशा सूचनाही मंडळांना देण्यात 
आल्या आहेत. 
 
प्रसाद हाताळणार्‍या व्यक्तीचे कपडे स्वच्छ असावेत, भाविकांना कुठल्याही परिस्थितीत शिळे अन्नपदार्थ सेवनास देऊ नये, तसेच गणेश मंडळांनी भाविकांसाठी तयार केलेला प्रसाद स्वच्छ काचेच्या झाकणात किंवा पारदर्शक प्लास्टिकच्या आवरणातच झाकून ठेवावा आणि स्वच्छ हात धुवूनच प्रसाद तयार करावा, यासह संसर्गजन्य आजार असणार्‍या व्यक्तीने प्रसाद बनवणे व हाताळण्याची कोणतीच कामे करु नयेत, अशा प्रकारच्या अनेक सूचना एफडीएकडून गणेश मंडळांना देण्यात आल्या आहेत. 
 
स्वत: प्रसाद तयार करुन भाविकांना वितरित करणार्‍या मंडळांनी एफडीएच्या संकेतस्थळावर जाऊन १०० रुपये शुल्क भरुन नोंद करुन नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावे. कच्च्या अन्न पदार्थाची खरेदी देयकांची नोंद ठेवावी, तसेच कच्चे अन्न पदार्थ परवानाधारक दुकानातूनच खरेदी करावीत,असे आदेश एफडीएचे सहआयुक्त (अन्न) सुरेश अन्नपुरे यांनी दिले आहेत.

अधिनियमाचे पालन करण्याचे आवाहन 

गणपतीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना मंडळांकडून प्रसाद देण्यात येतो. लहानांपासून तर ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण प्रसादाचे सेवन करत असल्याने प्रसाद तयार करताना आवश्यक खबरदारी मंडळांनी घ्यावी, यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाने पावले उचलली आहेत. गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी, प्रसाद उत्पादक, अन्न व्यावसायिकांना याबाबत काही सूचना देण्यात आल्या असून अन्नसुरक्षा मानके अधिनियमाचे पालन करण्याविषयी आवाहन करण्यात आले आहे.

दुग्धजन्य पदार्थात भेसळीचे प्रकार वाढले 

राज्यात गणेशोत्सवाला नुकतीच सुरुवात झाली आहे  त्यामुळे मिठाईच्या दुकानात आता गर्दी होऊ लागली आहे. या काळात मिठाई, दुग्धजन्य पदार्थांना मोठ्या प्रमाणावर मागणी असते. या मागणीचा पुरवठा कमी पडू नये, म्हणून भेसळखोरांकडून भेसळयुक्त दुग्धजन्य पदार्थ तयार केले जात असतात. दरवर्षी राज्यात अनेक ठिकाणी एफडीएकडून भेसळयुक्त दूध, पनीर, मिठाईचा साठा जप्त करण्यात येत असतो. 

खाद्य पदार्थांच्या नमुन्यांची तपासणी

गणेशोत्सवात मिठाई, खवा, मावा या अन्नपदार्थांना मोठी मागणी असते. त्यामुळे या काळात भेसळ, कमी दर्जाच्या उत्पादनाची बाजारात विक्री होण्याची शयता अधिक असते. हे प्रकार रोखण्यासाठी, तसेच ग्राहकांना सुरक्षित आणि सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी संशयित पदार्थाचे नमुने घेतले जात आहेत. प्रत्येक नागरिकास सुरक्षित आणि सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, यासाठी प्रशासनातील अधिकार्‍यांनी तपासणी आणि खाद्य नमुने घेण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे.

Related Articles